देश- विदेशाच्या गोष्टी

सुवर्णभुमी एअरपोर्ट/ बँकाँग/ इमिग्रेशन डेस्क/ सकाळी ११ वाजता

           इमिग्रेशनसाठी शिस्तीत पुढे सरकणा-या लाईनमधे माझा साधारण आठवा नंबर वगैरे. एअरपोर्टवरची स्वच्छता, लोकांच्या कपड्याची फॅशन न्याहळत असता, चपलेवर काहीतरी येऊन आदळलं. पाहिलं तर एक छोट्टुशी कार. तिच्या मागोमाग कारचा मालक. दोन वर्षांचं पोर, माझ्यापाशी येऊन थबकला. मी वाकून कार उचलली, त्याच्या हातात दिली. त्याने ती सुरक्षित अंतरावरून घेतली. व त्याच्या आईकडे सरकला. आई बाबागाडीतील मुलीशी बोलण्यात गर्क. त्याने आईच्या टीशर्टला एक दोन हिसके दिले. आपली बॅग मागितली. तिने ती दिली. तो तिथेच खाली मांडी घालून बसला. बॅग उघडली, आतून हवाबंद डबा काढला. उघडला. आत सँडविचचे काप होते. त्यातला एक काप उचलला, तोंडात घातला. डबा व्यवस्थित होता तसा बंद केला, झाकण ओढून तो बंद झाल्याची खात्री केली! व तो बॅगेत सरकवला. बॅग आईपाशी दिली. अन् आईकडे वळूनही न बघता कार पळवत ब्रुम ब्रुम करू लागला.....

------**---------

काळाराम मंदिर/ नाशिक/ आतला मंडप/ संध्याकाळी ७ वाजता/ नाशिक

        दर्शन घेऊन क्षणभर टेकावे म्हणून मंदिराच्या मंडपात बसलो. फार गर्दी नव्हती. सोयीने भाविक येत होते. मंडपात येताच एका बाईच्या कडेवरील साधारण ५ वर्षींची मुलगी खाली उतरली. आईने बराचवेळ उचलून घेतली असावी, मुलगी उतरताच आईने आपले दंड आपल्याच हाताने जरासे दाबून मोकळे केले. मुलीचं तोंड हातातल्या सीताफळाने संपूर्ण बरबटलेलं. आईच्या कडेवरून उतरताच तिला सर्वत्र धावायचा मोह अनावर झाला पण हातातल्या सिताफळाने अडचण केलेली. रामापुढे डोळे झाकून उभ्या आईच्या पदराला हिने जाऊन हिसके दिले. आईने तिच्याकडे पाहिलं, लेकीनं उरलं सुरलं सीताफळ पुढे केलं. आईने ते घेतलं. आता लेक आईला बरबटलेले दहाही बोटं दाखवू लागली. आईने हसून पदर पुढे केला. लेकीने हात तोंड स्वच्छ पुसले. अन् आईकडे वळूनही न बघता मंदिराच्या आवारात धुम ठोकली....
-बागेश्री
#देशविदेशाच्या #गोष्टी

Post a Comment

0 Comments