ऋतू, मनाचा!

कुठलाच ऋतू मनभावन वाटत नाही, असा मनाचा एक ऋतू येतो! तेव्हा काही म्हणता कशात रस वाटत नाही. उत्साह येत नाही. अशा वेळी कशाचाच मुद्दाम सोस करू नये. जरा मनाच्या कलाने घ्यावं. जरा रेंगाळावं, जरा आळसवावं. आपण मनाला कसलाच जाच करत नाही आहोत हे त्याला हळू हळू जाणवायला लागतं, आपोआप ते कह्यात येतं. काहीतरी करूया म्हणून उचल खाऊ लागतं. आता मात्र त्याला हवा असतो एक नवा ऋतू! अशावेळी बेमालूम बाहेरचा ऋतूच आत सरकवावा. मऊ ऊन पडलेलं असू दे, की भुरभुर पाऊस. कडाक्याची थंडी असू दे किंवा सैराट वारा. पानगळ असो वा नव्या बहराचा ऋतू. मनाची माती बाहेरच्या मातीशी एकरूप होईस्तो मळत रहायची...
          आत- बाहेरचा ऋतू एक करून टाकण्याची, हीच नामी संधी. मग आपल्या आतल्या उलाढाली बाहेरच्या हवेशी इतक्या एकरूप होतात. की आपण ज्या निसर्गातून जन्माला आलोय त्याच निसर्गातले होऊन जातो. तो इतका मेहेरबान अवती भवती असल्यावर आतल्या समस्या, उणी- दुणी, दुखणी- खुपणी वेगळे अस्तित्व करून आपल्या आत ठिय्या मारून बसतच नाहीत. वाहत्या वेळेनुसार सारे काही वाहू लागते. आपणही, आपले आयुष्यही.....
-बागेश्री

Post a Comment

0 Comments