चल री सजनी...

उत्साहानं मुसमूसलेलं घर... अंगणातला मांडव..... त्यावर सोडलेल्या फुलांच्या माळा... घरात पदार्थांची रेलचेल.. खमंग वास... गोडाचा घमघमाट... पाहुण्यांची उठ बस.... चपलांचं स्टँड उपरांडून वाहत असलेलं... घराच्या आत आई, आजी, आत्या, काकू, माम्यांची अखंड लगबग..  कुणी मुदपाकखान्यात मेतकूट करतंय.... कुठे पुडचटणीवर फोडणी पडतेय...  दूर आतल्या खोलीत... निलगीरीच्या तेलाचा बोळा, वाग्दत्त वधूच्या वाळत चालल्या मेंदीवर अलगद फिरत असलेला....  त्याचा मंद सुगंध तिच्या मैत्रिणींच्या खळखळाटातून वाहत असलेला.. करवलीचे चूडा भरले हात तर वधूच्या मदतीसाठी सारखे तत्पर... तिची सर्व तयारी करून देताना तिला उत्साहाचं उधाण आलेलं...  एका खोलीत आहेराच्या कपड्यांचं वर्गीकरण जोशात चाललेलं.... को-या कपड्यांच्या कुरकूरीत वासाने खोली भरून गेलेली.... बायकांच्या अखंड लगबगीची सूचना,  बांगड्यांची किणकीण अंगणातल्या पुरुष मंडळीच्या गप्पांच्या फडापर्यंत पोचवत असलेली....  लहान- सहान आपापसात दंग..  घरभर धावून त्यांनी घराला एक वेगळंच चैतन्य दिलेलं..  मधेच एखाद्या काकांची "ए डिंग्या ssss दमानं रे...  पडाल बिडाल पाय अडकून.. वारं भरलं की काय अंगाssत?" अशी हाक... ती विरते ना विरते तो आतून एखादी आत्याची "ओ सुमीचे बाबाss जरा बघा की या पोरांकडे? नुस्ता उच्छाद मांडलाय... (मग हळूच कुचकूचत) यांना तं मेलं कधीच नको पोरांकडे लक्ष द्यायला.. सगळीकडे आपणच बघायचं!!"  असले आवाज क्षणभर उठून शांत होणारे.. आणि उत्साहानं मुसमूसलेलं लग्नघर पुन्हा एकदा आपापल्या उद्योगात दंग बुडून गेलेलं... 
                      या सगळ्यांत कुठेतरी "पडेल ना पार सगळं व्यवस्थित?" च्या चिंतेची रेघ बापाच्या चेह-यावर उमटलेली आणि डोळ्यांनीच आई त्यांना "होईल सारं व्यवस्थित!" चा दिलासा देत असलेली..... खास बोलावलेले सनई वादक सकाळ- संध्याकाळ सनई वाजवून लग्नघराला पळापळाने सोहळ्याच्या दिवसाकडे ढकलत असलेले... आणि बघता बघता लग्नाचा दिवसच येऊन ठेपलेला....

              सोहळा डोळ्यांत भरण्याजोगा होतो.... आमंत्रितांची गर्दी, हास्याचे खळखळाट, खाद्यपदार्थांची रेलेचेल,  सजून धजून आलेल्या पाहूणे मंडळीकडून "सुरेख झाला हो सोहळा... पोरगी खुश आहे" ची पावती स्वीकारतांना बाप लेकीकडे हलकेच बघतो आणि तिचा हसरा चेहरा पाहून समाधानाने नि:श्वास टाकतो... मुलीला उद्याचं आयुष्य साद घालत असतं... गेले काही दिवस तर लग्नानंतरचं प्लॅनिंग, नवा गाव, नवा देश, नवं घर, नवा वेष आणि प्रचंड प्रेम करणारा नवरा यांनीच व्यापलेले.... स्टेजवरून तिची नजर नातेवाईकांच्या सगळ्या गोतावळ्याला पार करत बरोब्बर आईवर स्थिरावते.... केवढी देखणी दिसतेय ही... किती छान तयार झालीये... केवढी अगत्याने वावरतेय...  गेल्या काही दिवसात तिच्याशी साधं बसून बोललेही नाही .. उद्यापासून ही आपल्याला दररोज दिसणार नाही. ही इथे, मी तिथे. कुणापशी हट्ट करायचा, कुणापाशी मन उघडून ठेवायचं?......  नुसता आपला चेहरा पाहिला तरी मनात काय चाललंय ते अचूक ओळखते ही, आज निघून गेल्यावर तिची व आपली साधी नजरानजरही व्हायची नाही... या विचाराने तिच्या आत कालवतं... लग्न ठरल्यापासून कटाक्षाने मनाच्या काठाशी ठेवलेले विचार आत उतरून धूडगूस घालू लागतात... पाहता पाहता तिला फक्त आई- बाबांपासून दुरावणारं स्वतःचं आस्तित्व जाणवू लागतं. भर गर्दीत एकटं पडल्यासारखं वाटतं... डोळे टच्च भरतात. भरून वाहू लागतात...... नजर बापाकडे वळते. ते साश्रू डोळे लांबूनच पाहून बापाच्या पोटात गलबलतं..... तिच्या आतलं वादळ त्यांना थेट तिथवर जाणवतं...

"बाबुल पछताए हाथों को मल के, 
काहे दिया परदेस टुकड़े को दिल के
आँसू लिये, सोच रहा, दूर खड़ा रे..."

कितीही जन-रीत म्हटली तरीही हे सोपं नसतं.. काळजाचा तुकडा काढून कुणा हाती सुपूर्द करताना, 'मी माझी कन्या दान करतो आहे' असे म्हणताना बाप आतून हललेला असतो. ती तिचं नाव- गाव- पत्ता, बालपण त्याच्या ओंजळीत टाकून ती उडून जाणार असते.. तिच्या या प्रवासात तिला काडीचीही अडचण येऊ नये म्हणून मनातल्या मनात भगवंताकडे साकडं घालणारा बाप आपली घालमेल पोटात घेऊन वावरतो....

बाप- लेकीतला मूक संवाद आई टिपते. तिला सारं ठाऊक... तिचाही एक असाच प्रवास घडलेला... आपली लेक समर्थ आहे.. आपण पाहून दिलेली सोयरीक योग्य आहे... लेक सुखाने नांदणार, तिला काही कमी पडणार नाही.... हे स्वतःला खात्रीने सांगतांना मात्र झर झर डोळे का भरून येताहेत, तिचं तिलाही कळत नाही..... नवा प्रवास सुरू करताना मागचं मागे किती न काय सोडून द्यावं लागतं..  कितीही प्रिय असलं तरी तिथेच ठेवून निघावं लागतं, याची जाणीव तिच्या हृदयाला आहे .....

"ममता का आँचल, गुड़ियों का कंगना,
छोटी बड़ी सखियाँ, घर गली अंगना 
छूट गया, छूट गया, छूट गया रे..."

तिकडे ती स्वत:ला सांगतेय... हा दिवस येणार आपल्याला ठाऊक होतं ना.... तरीही  जिथे बागडलो, जे आपलंच आहे असं समजून वावरत राहिलो ते आपल्यापासून तुटताना हा त्रास का होतोय...नाही, पण असं हळवं वागून चालणार नाही... आता उचललेल्या पावलाने पुढे निघायला हवं... थांबणं, अडखळणं नको... तिच्या त्या भारल्या अवस्थेत क्षणभर थांबून ती सगळीकडे बघते अन् एवढ्या गोतावळ्यातही आपण केवढे एकटे आहोत याची जाणीव तिला होते..... एकाकीपणाच्या टोकावर आपण उभे आहोत असं तिला वाटतं कारण एकीकडे जन्मघर सुटलेलं आणि दुसरीकडे नव्या घराने अजून पुरतं सामावून घेतलेलं नाही.... या क्षणी आपण कुणाचे, आपलं कोण?

"दुल्हन बनके गोरी खड़ी है,
कोई नही अपना.. कैसी घड़ी है?
कोई यहाँ, कोई वहाँ, कोई कहाँ रे...."

तिच्या मनातला हा झगडा अबोलपणे समजून घेणारा एक हात नकळत तिचा हात आपल्या हातात घेतो...  
तो आश्वासक स्पर्श तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत म्हणतो....

"चल री सजनी अब क्या सोचे...
कजरा ना बह जाये रोते रोते...."
-बागेश्री


Post a Comment

0 Comments