इगो- महाल

आपण एकटे असताना, फक्त स्वतःसोबत असताना आपला इगो कुठे असतो? एकांतात आपल्याला इगो का जाणवत नाही? कारण तो तिथे नसतोच!! इगो माणसाच्या आत नाही तर दोन माणसांच्या मधल्या परिसरात वास्तव्याला असतो. आपल्या घराबाहेर आपला. दुसऱ्याच्या घराबाहेर त्याचा. आपल्याला एकमेकांकडे जाताना इगोच्या दारातून जावे लागते.
     आधी आधी झोपडी करून राहणारा इगो निमूट असतो. मर्यादेत असतो.. पण पुढे पुढे आपल्याच लक्षात येतं की आपल्या भेटीला येणारा प्रत्येकजण आपल्या इगोच्या दारातून आपल्याकडे येतो. म्हणजे आधी इगोची गाठ भेट मग आपली. पण मग दारात झोपडी आणि गरिबीचे प्रदर्शन. छे छे. इगो मोठा झाला पाहिजे. आपण त्याला पक्कं घर बांधून देतो. आता आपल्याला भेटून गेलेला, आपल्या इगोचं पक्कं घर पाहून थक्क होतो. इरेस पेटतो. आपल्यापेक्षा काकणभर अधिक सरस व्हावे म्हणून त्याच्या दारातल्या इगोला तो माडी बांधून देतो. आपणही कमी नसतो.. आपण माडीवर माडी चढवतो. दोघेही तसूभर मागे सरत नाहीत. पाहता पाहता अटीतटीने दोन्ही घरांच्या समोर प्रशस्त महाल उभे राहतात! आपली खुजी घरं त्या महालामागे दडून जातात... दारासमोर महाल उभा करून आपल्या मात्र आपल्या घरात नेहमीसारखे जगू लागतो. आपलं घरच आपल्यासाठी सुखसोयीचं, आरामाचं आणि आपल्याला पुरेल इतकं पुरेसं ठिकाण असतं...
       येणारा पाहुणा मात्र आपल्या प्रत्यक्ष भेटीआधी इगोमहालात शाही थाटात पाहुणचार घेऊ लागतो. कधी बुजून परस्पर निघूनही जाऊ लागतो. आपल्या घरापर्यंत, थेट आपल्यापर्यंत पोचणाऱ्या माणसांच्या संख्येत घट होऊ लागलीय हे आपल्या लक्षातही येत नाही...
      
       पूर्वी परस्परांना सहज दिसणारी दोन घरं महालाच्या सावलीआड दिसेनाशी होतात... आता दोन माणसांच्या परिसरात, समोरा- समोर उभ्या महालांंच्या सज्ज्यातून, दोन इगो एकमेकांकडे फक्त तुच्छ नजरेने पहात उभे असतात...
-बागेश्री

Post a Comment

1 Comments