सोनेरी मासा

खूप विजडम असलेल्या दोन बायका गप्पा मारत असल्या की त्यांना ऐकायला मला फार आवडतं. कारण माझी सून कशी, मुलगा कसा वागतो, जाऊ कशी आहे, दिरांचे काय चुकले, थकलेली सासू अजूनही हट्टी किती, ही दैनंदिन आयुष्यातली जळमटे त्यांच्या गप्पांत नसतात तर, आपल्या जगण्याच्या खोल विहिरीतून त्या अनुभव शेंदून काढत असतात. आपण शेजारी करकरीत कोरडे बसून चिंब होत रहायचे. अचानक त्यांच्या सुरकुत्यांच्या जाळ्यात अडकतो एखादा लख्ख सोनेरी मासा, तो त्या माझ्या हाती देत म्हणतात हा घे आम्ही पोसलेला अर्क शहाणपणा. हाती घे, समजून घे आणि तुझ्या जगण्याच्या विहीरीत सोड त्याला. असा सहज कोण कुणाला आपल्या जगण्याचा अर्क देत असतो का? पण मला मिळतो. त्यांच्या शेजारी बसल्यावर कान होऊन ऐकताना. त्यांनी उगाळून प्यायलेला असतो, पुरुषांचा नखरेल लहरीपणा आणि उबदार सोशिक स्त्रीत्व अखंड ओसंडत असतं अंगाखांद्यावरून, तरीही त्या मऊ वाटत नाहीत कुठेच माझ्याशी बोलताना. कणखर असतात. जन्मतः नाही. अनुभव शेंदून शेंदून होतात. टणक हात, कठोर मन. आणि तरीही विहिरीच्या पाण्यातली ओल असते त्यांच्या जाळीदार नक्षीच्या डोळ्यांत. मला माझ्यातला गाळ स्वच्छ करायला पुरते तेवढी. मी भरून घेते आयता मिळालेला शहाणपणा. गुपचूप शांतपणे. तसाही स्वार्थ अबोलच असतो. कदाचित उद्या मलाही कुणाकडून ऐकून हवंय, खूप विजडम असलेली बाई बोलत बसली की तिला ऐकायला मला फार आवडतं. तसाही मला कुठे आयुष्यभर तो सोनेरी मासा माझ्यापाशीच ठेवायचाय?
-बागेश्री 

Post a Comment

1 Comments