मौनताल

  रूटीनला कंटाळून चालायला निघाले. एकटीच. बराचवेळ डांबरी रस्ता धरून चालत राहिले. ओळखीच्या खाणाखुणा मागे पडल्या. चालत राहिले.  मग एके ठिकाणी पायवाट फुटलेली दिसली. घोट्याएवढ्या वाढलेल्या गवतातून मातकट नागमोडी लांबवर गेलेली. ती धरली. वेळेकाळाचे बंधन नव्हतेच. मोबाईलही हटकून घरी ठेवलेला. त्यामुळे कानाला हेडसेटही नव्हता. बराचवेळ चालत राहिले. मागे नजर टाकली तेव्हा डांबरी रस्ता, रहदारी लांब राहिलेली. ती जणू या जगाचा भाग नाही, किंवा मीच त्या जगाचा भाग नाही इतके आम्ही एकमेकांना उपरे होऊन गेलो. मी माझ्यात गर्क झाले. 

         एका क्षणी जाणवलं की कधीही न पाहिलेल्या पक्षांच्या ताना मोकळ्या कानातून आत जातायत. उर भरून घेतलेला श्वास आतलं सगळं वातावरण बदलून टाकतोय. पंचेंद्रियांना सुखावतील अशा झुळका अंगावर येतायत. या माझ्या व निसर्गाच्या एकरूपतेत काही कमतरता राहून जाऊ नये म्हणून झिमझिम पावसालाही सुरूवात झाली. झिमझिम शब्दही त्याला जड वाटेल. इतका तो नाजूक पडू लागला. वर पाहिलं तर आकाश पोकळ अपरंपार दिसत नव्हतं. तर एखाद्या भव्य राजवाड्याचा कलाबूत केलेला घुमट असल्यासारखं भरीव वाटत होतं. पाऊस चिंब करत नव्हता. मला वाटतं तो त्या हेतूने पडतही नव्हता. या क्षणी या आसमंतात सारे उपस्थित आहेत तसा मीही आहे. इतकं सांगण्यापुरताच तिथे होता. झाडं वात्सल्याने त्याचं लाडिक बरसणं पहात होती. वारा त्या भुरभूरीला झाडांपर्यंत पोचू न देता आपल्यासवे कुठेतरी उडवून नेत होता. एकाएकी झाडांचं मनोगत कळल्यागत, वारा गप्प झाला. म्हणजे तो आत्ता इथेच होता असं सांगूनही खरं वाटणार नाही, इतका मौन झाला. 

             पाऊस संथपणे सर्वत्र स्थिरावू लागला. साचलेल्या डबक्यांवर हलकी थरथर उमटू लागली. पाना- फुला- फांद्यावर तो कापसासारखा झरझरत नक्षीकाम करू लागला. बराचवेळ भुरभूर साठल्यानंतर त्याचा एखादा थेंब व्हावा अन पानांना तो भार झाल्याने त्यांनी तो अलगद निसटू द्यावा... अशा संथ लयीत सारं सुरू झालं. त्या क्षणी मी एकमेव सजीव हालचाल करून ती सबंध लय बिघडवून टाकते आहे अशी एकाएकी भावना झाली. आणि एका दगडावर स्थिरावून त्या लयबद्ध तालासुराचं संगीत मी कान होऊन ऐकू लागले. नेत्र होऊन पाहू लागले. त्या संपूर्ण निसर्गाला समजून घेत त्याचाच एक भाग झाल्याने पाऊस आता माझ्यावरही कापूस होऊन बरसत होता. त्याचा स्पर्श कळत होता. पण तो त्रासदायी नव्हता. आपल्याशी मनाने घट्ट जोडलेला माणूस ज्या हळूवार स्पर्शाने आपल्याशी संवाद करेल एवढा मऊ तो बरसत होता. त्याक्षणी साक्षात्कार झाल्यासारखा मनात विचार चमकला. आयुष्यात येणारं सुखही असंच असतं. ते असतं पण आपल्याला मनाजोगतं चिंब चिंब करून टाकत नाही. आपल्याला त्याने सबंध भिजवून टाकावे ही आपली आसक्ती असते. आणि त्याकरताच सगळा झगडा असतो. पण त्या सुखाचं हे असं असणं, अस्तित्व न कळू देताही ते उपस्थित असणं आपल्या लक्षात येत नाही. ते कळण्याकरता असं अचानक एके दिवशी एके ठिकाणी स्तब्ध बसायला हवं. सुखाचं आपल्या भोवतालचं अस्तित्व जाणवण्याकरता आपल्याकडे पुरेसं मौन असायला पाहिजे. म्हणजे त्याची अलवार भुरभूर आपल्या वाचेने उडून सभोवताली हरवून जाणार नाही. तेव्हाच ते आपल्यावर बरसत राहिल आणि त्या मऊ स्पर्शाने आपण नखशिखांत मोहरून येऊ...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments