डोळे

मला तुझे डोळे
माझ्यासारखेच वाटतात
तितकेच खोल, तितकेच अपूर्ण
एकेकदा असंही वाटतं
मला आणि तुला
दिसतही सारखंच असावं
वाटतही सारखंच असावं
आपल्यात
रुजतही सारखंच असावं!
पण तू माझ्याकडे पाहतोस तेव्हा
तुला दिसणारी मी
मला नाहीच दिसत कधी..
मी विचारते तुला 
हाच प्रश्न पुन्हा पुन्हा
तू बोलत काहीच नाहीस
नजरेची पालखी करतोस
मला त्यात बसवतोस
आणि घेऊन जातोस
स्वतःच्या आत
फेरफटका मारायला..
आणतोस फिरवून,
तिथे नांदत असलेल्या
माझ्या वेगवेगळ्या रुपांमधून!
आणि सोडतोस आणूूून 
बाहेर जेव्हा .. वास्तवाच्या जगामध्ये
तेव्हा मात्र, माझी खात्री पटते

तुझे नि माझे डोळे
अगदीच सारखे आहेत!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments