Happy Women's Day!

 .... तिने घाईने हेडसेटचे इअरप्लग्स कानात कोंबले, आणि पॉप म्युज्यीक सुरु केलं. आवाज सगळ्यात वरच्या लेव्हलला नेला. मनातला कोलाहल ऐकू येऊ नये म्हणून शक्य ती तरतूद केली. तरीही आतला कोलाहल स्वस्थ बसू देईना तेव्हा गाण्याबरोबर मोठ्याने गाऊदेखील लागली. कानात मोठा आवाज, बाहेर तिचा आवाज. ह्या आवाजात आतला आवाज दडपून जाईल अशी तिची अपेक्षा. ती बेडरूम मध्ये गेली, मग हॉल मध्ये, बाल्कनीत. पण आतला कोलाहल अजून मोठा मोठाच होत गेला.... आता तिने ठरवलं आवडीचं गाणं लावायचं. मग ते गाता गाता फेव्हरेट स्टेप्स पण करायच्या. आरशासमोर आली.. गाता गाता नाचू लागली आणि पाहता पाहता तिला रडू फुटलं. "कशापासून धावतोय आपण, कोणापासून धावतोय?" जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर स्वतःचा पिच्छा ती कशी सोडवू शकणार होती? मोबाईल, हेडसेट भिरकावला मात्र रडू थांबवलं नाही. मोकळी होत गेली. मळभ निवळू दिलं.

तिला कळून चुकलं. येता काही काळ अनेक प्रश्न आता आतून घोंघावत राहतील. तिने ठरवलं प्रत्येक प्रश्नाला सामोरं जायचं. उत्तरं द्यायची. समाधान होत नाही, तोवर उत्तरं द्यायची. त्यापासून पळायचं नाही. जगाशी वागताना संयम दाखवतो ना? स्वतःसोबतही दाखवायचा. सगळी उत्तरं द्यायची. स्वतःला झिडकारायचं नाही. त्या विचारासरशी तिला बरंच शांत वाटलं....

तिने स्वतःला चांगलं ट्रीट करायचं ठरवलं. आधी रडून सुजलेले डोळे, चेहरा धुतला. केस टापटीप केले. कपडे बदलले. स्वतःला आवडतो म्हणून वाफाळता चहा करून घेतला. 

आज तिला एक गोष्ट पक्की कळून चुकली. स्वतःला टाळता येत नसतं. स्वतःशी असलेलं मैत्रच आयुष्यभर पुरतं....स्वतःचा हात हाती घट्ट असेल तर कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडता येतं... चहाचा घोट घेत- घेत तिची नजर दूर कोठेतरी स्थिरावत गेली...

©बागेश्री

--------------**-------------

This Women's day, start with Yourself. Shake hands with self, be your wonderful friend.. this is the best gift you can offer to yourselves. Love being what you are. Reborn as you, Be You! 😊

-Bageshree


Post a Comment

2 Comments

  1. अगदी बरोबर, खूपच सुंदर

    ReplyDelete
  2. अतिशय relate झालं.. we think so alike..

    ReplyDelete