The Great Indian Kitchen

"बाई कुठे काय करते?"

या प्रश्नाचे दृष्यात्मक उत्तर म्हणजे "The Great Indian Kitchen"

बाई आणि तिचे प्रश्न हा आपल्या  समाजात अत्यंत रटाळ आणि रडका वाटणारा  विषय. कारण त्याबद्दल बोलताना खुद्द बाईच इतकी हवालदिल आणि करूणापूर्ण चेहरा घेऊन बसलेली असते की, घरांघरांतून "झालं हीचं सुरू पुन्हा" असाच सूर काढण्याची पद्धत आहे. या पद्धतीला संपूर्ण फाटा देत एखादा पुरूष एखादा अभिजात सिनेमा करू शकत असेल तर तो आहे इंडीयन किचन. 

           यातली नववधू आपल्या सासरी त्यांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या चौकटीत चपखल बसू पाहतेय. सर्वच मुली ही मनिषा घेऊन सासरी जातात त्याला नायिका अपवाद नाही. सुरुवातीला प्रचंड उत्साहाने केलेल्या तडजोडी या काही आपल्या स्वभावाचा भाग नाहीत हे त्या बुद्धीमान मुलीच्या लक्षात येते. पण बचाबचा बोलून व्यक्त होणा-यातली ती नसल्याने मूकअभिनय दृष्ये आपल्याला तिच्या भावना पोहोचवतात. दररोज तीच कामे, त्याच पद्धतीने, अथक करताना दोन गोड शब्दांचा ओलावा, एक शब्दभराचे थॅंक यू वा जराशा मदतीचा मोबदला मिळणारी बाई आतल्या आत धूमसता ज्वालामुखी असू शकते आणि तिच्या अस्तित्त्वाचा लाव्हा कुठल्याही क्षणी फुटून बाहेर येऊ शकतो याची ददात नसलेली पुरुषप्रधान संस्कृती यात बेमालूम रंगवली आहे. 

           पुरूषी इगोचे वस्तुमान या सिनेमात ठायी ठायी जाणवते. नवरा- बायकोच्या नात्यात तिला वाटलेले बेधडक बोलल्यानंतर कपात घुमणारे वादळ  इतके चपखल पकडले आहे की जरावेळ बसल्या जागी आपणही घुसमटतो. सिनेमा कमी वेगाने क्लायमॅक्सकडे सरकतो पण त्या कमी वेगाची गंमत अशी आहे की पुरुषप्रधान संस्कृतीचा फुगा मोठा मोठा होत जातो आणि शेवटी आता फोडा रे हा पोकळ फुगा सहन होत नाहीये अशी प्रेक्षकांची अवस्था होते. आणि तो फुगा दिग्दर्शकाने असा काही फोडलाय की त्याला दाद दिल्यावाचून रहावत नाही!! याबद्दल मी अजिबातच खुलासा करणार नाहीये. ती तुम्ही पाहण्याची गोष्ट आहे. स्वच्छ मनाने पहा. थोडं थोडं आत्मपरिक्षणही करा. या सिनेमासारखी स्थिती आता खरंतर घरोघरी नाहीये पण समूळ बदललेलीही नाहीये. दिग्दर्शकाने फार संवेदनशीलतेने विषय हाताळलाय शिवाय कलाकारांचा सहज अभिनय ही देखील जमेची बाजू आहे. 

सिनेमा मुक्यानेच फार फार बोलतो, तो अनुभव घ्यायला म्हणून एकदा पहाच.

- बागेश्री

 (ही फिल्म अ‍ॅमेझॉन प्राईमवर इंग्रजी सबटायटल्स सकट उपलब्ध आहे)

Post a Comment

0 Comments