अशाच एका पावसाळी

अशाच एका पावसाळी
रानावनातून चालताना
अनोळखी रस्त्यांतून
ओळखीचं मन शोधताना
दिसला मला एक कागद
घडी करून ठेवलेला
खुणेच्या जागी 
कुणाची तरी
वाट बघत असलेला..
येता- जाता,
जाता- येता
झाडाच्या पांधीत खोवलेला
कागद उगा खुणावू लागला,
काय असेल नेमके त्यात 
प्रश्न मनाला छळू लागला..!

निरोपाचा शब्द असेल की
असेल भेटीची खूण,
प्रेमाची साद की
गाण्याची धून...?
असेल का एखादी 
अर्धवट कविता की
ठेवलाय नुसता कोरा कागद
कुणी खोडी करण्याकरिता...?
दुसरे दिवशी ठरलं आता
कागद उघडून पहायचा
रोज रोजच्या कोड्याचा
अंत करून टाकायचा...
त्याच रात्री स्वप्नात माझ्या
तोच कागद आला होता
तीच घडी तीच जागा
मुडपून तसाच ठेवला होता
घडी घडी सोडवली अन
उघडत गेले कागद जेव्हा
विनाकारण हात माझा
नकोनकोसा थरथरला होता...
निळ्या जांभळ्या शाईची
अक्षरे पार ओघळली होती
कुणास ठाऊक कुठली भावना
न सांगताच
विरघळली होती..!!
जाग आली धावत गेले
नव्हता कागद जागेवर
कालच्या सोसाट वादळाने
नेला बहुतेक बरोबर.....
-बागेश्री

Post a Comment

0 Comments