काल तुझी चिमनी, निजलीच न्हाई!


कोरोना काळात जवळच्या, नातलगांच्या, परिचितांच्या शेकडो बातम्या कानावर आल्या.  वृत्तपत्रांतून लहानग्या लेकरांना मागे ठेवून आई निघून गेल्याचे वाचल्यावर तर मन दरवेळी हळहळीने ढवळून निघाले. त्या सगळ्या अस्वस्थतेतून सुचलेली ही कविता.

--------------------------------------------------------
काल तुझी चिमनी, निजलीच न्हाई!

तू गेलीस अन् पणतीत वात तशीच -हायली...
तुळशीतल्या मातीला ओल तशीच -हायली
चुलीतल्या लाकडाची धग बुजलीच नाही
काल तुझी चिमनी,
निजलीच न्हाई..
सारवलं होतंस काल आंगन रेखीव
काढली होतीस रांगोळी आखीव
सडा सारवन आज  झालीच न्हाई
घराला जाग काई आलीच न्हाई
घेतलं होतंस काल लेकरु थानाला
भाकर दिलीस भागल्या जीवाला
चिमनीची चोच आज भिजलीच न्हाई
लागली भूक पन इझलीच न्हाई
चोचीने मांडलाय आकांत घरभर
सावरायला तिला तरी, ये तू पळभर
हाकही जाईना, दूर गेलीस अशी
कळंना ही झाली, पडझड कशी?
घराला घरपण काई उरलंच न्हाई
काल तुजी चिमनी
निजलीच न्हाई....
-बागेश्री

Post a Comment

4 Comments

  1. हेच ते. आतुन हलवणारे. याला म्हणतात साहित्य.

    ReplyDelete
  2. कुणी काय हरवलं हे त्या त्या जीवांनाच माहीत. बाधित झाली म्हणून दवाखान्यात गेली आणि तिकडून परस्पर अमरधाम.चेहरा तर नाहीच दिसला पण शेवटचे अंत्यसंस्कारसुद्धा करता आले नाहीत...
    ही दुःखं कित्येक जीवांनी भोगली.
    आईवडील गमावलेले कितीतरी लहानगे जीव आहेत...😢

    ReplyDelete