कृष्णे


कृष्णे,
तू युगानुयुगे घेतला आहेस जन्म
येत राहिली आहेस
प्रत्येक युगात,
वेगळ्या रुपात!
जेव्हा म्हणून
मनमोकळी वागलीस
तेव्हा दुखावला
पुरुषी अहंकार
ज्याने नेले तुला
भरसभेत खेचत
केली तुझी विटंबना
तुझ्याच प्रियजनांदेखत..
करणारे हात, बघणारे डोळे
स्वतःला तुझे आप्तेष्ट म्हणवतात..

कृष्णे,
पण कळतंय आता की
तू फक्त प्रतीक होतीस
जी सांगून गेली
तुमच्या
शीलाची, भावनांची
मनाची विटंबना
होत राहिली आहे
होत राहील
ती थोपवता येऊच शकत नाही..
मात्र असू शकतो एक सखा
तुमच्या दुबळ्या पायांत
बळ भरणारा,
तुमच्या स्वाभिमानावरली राख फुंकरून 
आतला अंगार 
तेवता ठेवणारा..

जोवर तू येशील
तोवर त्यालाही यावे लागेल
प्रत्येक युगात
वेगळ्या रुपात
तुझा सोबती होऊन,
तुझा आत्मज होऊन..

कृष्णे,
तुझ्यासाठी
तुझ्या हक्काचा सखा होऊन!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments