कविता, मी, मुंबई आणि मर्ढेकर


 

शाळेत असताना "कविता" विषय फार झेपायचा नाही. त्यातले काव्य, प्रतिमा, अभ्यासापुरत्या आणि पास होण्यापुरत्या असायच्या. त्याचं कारण शब्दांची नेमकी उकल करून कवितेचं अंतरंग खुलं करून दाखवणारे, त्या कवितांइतके हळवे कुणी लाभले नसल्याचे म्हणता येईल. त्या मानाने गद्यविभाग समजायचा. कारण त्यात गोष्टी असायच्या.  गोष्टींचं आकर्षण वाटतं. त्यामुळे व्हायचं काय की उन्हाळ्याची सुट्टी संपून शाळा सुरू होण्याचे वेध लागले की पुढच्या वर्षीचे वह्या- पुस्तकं आणायला जीव आतूर व्हायचा त्याचं एकमेव कारण असायचं, बालभारती किंवा कुमारभारती. थोडक्यात मराठीचं पाठ्यपुस्तक!  आणि त्या रात्री पुस्तकांना खाकी कव्हर, त्यावर स्टीकर्स, नावं घालून ठेवणे असा एक मोठा कार्यक्रम पार पडायचा.

          दुस-या दिवशीपासून हातात कुमारभारती आणि सबंध दिवस त्याचा फडशा पाडण्यात जायचा. शाळेत गेल्यावर एकही धडा सरप्राईज नसायचा. बाई शिकवत असताना "आपल्याला कशी पुढची पुर्ण गोष्ट ठाऊक आहे" याची मजा मी मनातल्या मनात घेत असायचे. बरं त्याने माझ्या बाजूच्या मुलीला, बाईंना किंवा वर्गात कुणालाही कवडीचा फरक पडणार नसायचा. पण मी मात्र स्वतःवर खुश असायचे!

       मात्र आजही आठवतं की तेवढीच उदासीनता पद्य विभाग सुरू झाला की असायची. कविता शिकताना वाटायचे.  काहीतरी राहून जातंय. यात असं

काही असे आहे जे आपल्याला पुरतं कळत नाहीये, हाती लागता- लागता ते निसटतंय. ही जाणीव माझं शालेय शिक्षण संपेपर्यंत मनातून कधीच गेली नाही. त्यावर्षी झालं असं की,

          बा. सी. मर्ढेकरांची "पितात सारे गोड हिवाळा" कविता अभ्यासक्रमात होती. म्हणजे हिवाळ्यातल्या मुंबईचं वर्णन आम्ही शिकत होतो ते पार मराठवाड्यातल्या जालन्यात. शाळेच्या एका बंद वर्गात. ते ही भर उन्हाळ्यात बसून. म्हणजे कशाचा, कशाशी, कसलाही संबंध नसलेल्या सर्व गोष्टी तल्लीनतेने एकत्र आलेल्या. एक एक ओळ पुढे सरकतेय. आपण साक्षात मर्ढेकरांची कविता अभ्यासत आहोत, त्यांच्या प्रतिभेची सुतराम जाणीव नसलेले आम्ही आणि आमचे बाळबोध वय.  कविता चित्रमय आहे. त्यात बोलकी दृष्य आहेत. भल्यापहाटे एकटीच हळूहळू जागी होणारी निवांत मुंबई आणि काही वेळातच माणसे आणि वेग याने गजबजून जाणारी ती.  गजबज कोलाहलाचा ओरखडा उमटण्यापूर्वीचे शांत बंदर ते न्हालेल्या गर्भारशी बाईच्या चेह-यावरच्या सात्विक सोज्वळतेशी जोडतात. जणू मर्ढेकर तपशीलांसकट मुंबई डोळ्यासमोर उभी करतात.


न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर

मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर


नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती

संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती


गंजदार पांढऱ्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन् नारंगी

धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी


परंतु जालन्याने काही आयुष्यात काही समुद्र पाहिलेला नव्हता! तिथे मुंबईसारखी धडधडती लोकल होती. अखंड लगबग होती. उलट अख्खं शहर सकाळी १० शिवाय कामाला लागत नव्हतं. प्रत्येक शहराचं आपलं एक कल्चर असतं. ते आपल्या गतीनुसार काम करत असतं.  तर कधी समुद्र, समुद्रपक्षी, नांगरलेल्या बोटी, लोकल गजबज पाहिलेले आम्ही.  किंवा त्याकाळी आतासारखे गुगलही नव्हते. की बुवा काढला फोन आणि पाहिली मुंबई, पाहिला समुद्र नारिंगी बोटी आणि जोडले गेलो कवितेशी. म्हणजे काही करता काही मुंबई आमच्या हाती लागली नाही आणि तिथला हिवाळाही चिमटीत येता येता निसटून गेला...


पुढे कर्मधर्म संयोगाने, नोकरीसाठी मुंबईत आले. वर्किंग वुमन्स हॉस्टेल, वाशीला राहू लागले. १२ वा मजला. मोठ्ठी बाल्कनी. समोर ही अशी पसरलेली खाडी. समुद्राचा एक तुकडा आयुष्याला नकळत लाभला. आणि मी मुंबापुरीचा भाग झाले! तेव्हाच्या त्या एकटेपणात मुंबईच्या गजबजीशी सख्य जमलं ते कायमचं. लोकल कळली, धावपळ जमली, महत्त्वाकांक्षा उरीपोटी घेऊन धावणा-या लोकांच्या जत्थे समजले..  दिवस २४ तासात बसवण्याची किमया जमली आणि मी मुंबईचा; नव्हे मुंबई माझा भाग झाली.

            अशीच एकदा हिवाळ्यातल्या भल्या पहाटे जाग आली आणि सवयीने बाल्कनीत गेले. हलका गारठा. खाडीवरली आर्द्र गार हवा. मुंबईला जाग येण्याआधीचे गर्दी कोलाहलाने ओरखडे उमटण्याआधीचे शांत क्षण. एक दीर्घ श्वास आत ओढून घेताना ओठांवर आपोआप आले "पितात सारे गोड हिवाळा". कविता मुखपाठ होती. असे म्हटल्यापेक्षा मी म्हणेन शब्द मुखपाठ होते. पण त्या तिथे, त्या वेळी अर्थ येऊन भेटला! मी जागी झाल्याने स्वयंपाकीण बाईंनी चहाचे आधण ठेवलेले.  पत्ती आणि अद्रकाचा गंध मुंबईच्या त्या आर्द्र हवेत मिसळत चाललेला... रस्त्यावर एखादेच तुरळक वाहन.


"कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध...

कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुऱ्या शांततेचा निशिगंध"

         

      एखादी कविता अशी येऊन भेटेल. त्यातल्या दृष्यांसकट ती आपल्याला रसरशीत अनुभवता येईल असे कधीच वाटले नव्हते. ते ही लिहून झाल्याच्या कैक वर्षांनीही एखाद्या कवीचे शब्द, अर्थ संदर्भासकट तसेच, तिथेच राहू शकतात. त्यांची आपली भेट होऊ शकते. याचं आश्चर्य वाटत मी मर्ढेकरांना मनोमन नमस्कार पोचता केला..... आणि  "डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी" हे दृष्य साक्षात अनुभवत, कपातून गोड हिवाळा घोट घोट पीत राहिले....

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. सुंदर! एका क्षणात मी शालेय जीवनात गेलो होतो...

    ReplyDelete