मसान- Review
"प्रत्येकाला आपली गोष्ट सांगण्याचा हक्क आहे"
हे वाक्य खूप प्रभावी आहे. महत्त्वपूर्ण आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत आपण गोष्टी सांगत असतो, इतरांच्या ऐकत असतो "अरे थांब सांगतो तुला काय घडलं ते" किंवा "अगं काय झालं माहितीय का?" अशा वाक्यांच्या नंतर येणा-या कैक गोष्टी आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. एखादे नाटक किंवा सिनेमा आपण जाऊन बघतो. तेव्हा आपण गोष्ट ऐकायला, पहायला किंवा जरा पुढे जाऊन म्हणेन, अनुभवायला गेलेलो असतो.
नुकताच असा एक सिनेमा अनुभवला. "मसान". गोष्ट बनारसमधे घडते. काशी म्हटलं की डोळ्यांपुढे आधी घाट, गंगेची महाआरती, घाटावरचे विधी येतात. आपली पापं धुवून निघतील या श्रद्धेने गंगेत बुडी मारणारे भाविक येतात. परंतु तिथे शरीरं दहन करणा-या माणसांच्या आयुष्यावर एखादी गोष्ट करावी असे वाटणेच मुळात दुर्मिळ. कथानकात २ समांतर ट्रॅक्स आहेत.
ट्रॅक १: एक मुलगी (रिचा चढ्ढा) जिचा प्रियकर तिच्यादेखत मरतो, तिच्यावर केस होण्याची शक्यता आहे व तिच्या बापाला आपल्या मुलीला त्यातून वाचवायचे आहे.
ट्रॅक २: मसान (स्मशानात) प्रत्यक्ष देहदहनाचे काम करणारा. दिवसरात्र शरीरं जळताना पाहणारा. आयुष्यातले भयंकर कटू सत्य दररोज जगणारा एक भावी इन्जिनीअर म्हणजे विकी कौशल एका उच्चभ्रू मुलीच्या (श्वेता त्रिपाठी) प्रेमात पडतो. स्मशानातील रोजच्या रूक्ष कामावर आयुष्यात आलेले हळूवार प्रेम एक उतारा आहे. दोघांच्या जातीतले अंतर, त्यांचे लग्न होण्यातला मोठा अडसर आहे.

हे दोन ट्रॅक, रेल्वेच्या रुळासारखे क्लायमॅक्स पर्यंत समांतर धावतात आणि अलाहाबाद जंक्शनला येऊन ड्रॅमॅटिकली कसे मिळतात, ती स्क्रीनप्ले मधली गंमत आहे. सिनेमा संपत असताना, एकच विचार मागे राहून जातो. आपण सारे ओळखीचे- अनोळखी लोक, एकमेकांशी समांतर जगत आहोत. तरीही आपल्यातलेच कुणीतरी कुणालातरी आयुष्य मार्गी लावायला नकळत मदत करते आहे. कधीतरी ही माणसं आपल्याला येऊन भेटतीलही. परंतु त्यांची मदतनीस म्हणून ओळख आपल्याला पटेल, किंवा न पटेल? हे नियतीच जाणे.

विकी कौशल चा डेब्यू सिनेमा आहे. रिचा चड्ढा, संजय मिश्रा, पंकज त्रिपाठी सहज पर्फॉर्मन्सेस. पाहिला नसेल तर उत्तम गुंफलेल्या कथेचा अनुभव घेण्यासाठी म्हणून पाहण्यासारखा आहे.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments