अतरंगी रे


कित्येक ऑनर किलिंगच्या घटना आपण ऐकतो. त्यातलं क्रौर्य अंगावर काटा आणतं आणि असं अमानवीय कृत्य करून ते पालक मात्र स्वतःला ऑनर्ड समजतात. त्यांची मान ताठ असते. अशा कृत्याने ते, बंड करू शकणाऱ्या तरुण पिढीवर दहशत प्रस्थापित करू इच्छितात. परंतु ऑनर कील्ड केलेल्या तरूण जोडप्याला जर अपत्य असेल आणि त्याच्या डोळ्यांदेखत ही हत्या घडत असेल तर त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा फारसा मागोवा घेतला जात नाही. अगदी हाच विषय घेऊन आनंद एल राय यांनी "अतरंगी रे" केलाय.
           विषय गंभीर असला तरी त्याला हलक्या- फुलक्या पद्धतीने मांडण्यात त्यांना यश आलंय. मानसिक अवस्थेचे अनेक पदर सिनेमा समोर आणतो. ते प्रेक्षकांना कळावेत म्हणून जागोजागी त्याचे स्पष्टीकरण पात्रांच्या तोंडी येते. त्याचा दुष्परिणाम असा आहे की प्रत्येक सीन टॉकी झालाय. सर्वच पात्रं किती बोलतात, असे होऊन जाते. कुठे कुठे कथानक अंगावर येते. परंतु वर म्हटलं तसं मूळ विषयातच गांभीर्य आहे. सिनेमा पुढे जातो तसा नायिकेच्या (सारा) वागण्याचा अर्थ उलगडायला लागतो व तिने भूमिका चोख बजावल्याची खात्री व्हायला लागते. नायकाने (धनुष) त्याचे कॅरेक्टर फारच समजून घेऊन  साकारलेय. आपल्या बरोबरची व्यक्ती मानसिक स्तरावर काही अडचणींतून जात असेल तर अशा व्यक्तीला कसे हाताळावं, याचं उत्तम उदाहरण तो समोर ठेवतो. आणि त्याचं वागणं बोलणं शांत असल्यामुळे सिनेमाला बॅलॅन्स प्राप्त होतो.
        नेमके सिनेमाच्या प्री- क्लायमॅक्सला कथानक रेंगाळलेय. शिवाय "सिनेमाच्या शेवटालाच सर्व गोष्टींचा उलगडा करावा" या मोहापायी क्लॅमॅक्सच्या चढावर पोचताना प्रेक्षकांना धाप लागते. 
          तरीदेखील वेगळा विषय, वेगळ्या धाटणीने हाताळल्याबद्दल संपूर्ण टीमला दाद दिल्यावाचून रहावत नाही...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments